Monday 6 February 2012

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी संस्कारांची गरज !!



विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी संस्कारांची गरज.......

 आत्महत्या करणे म्हणजेच स्वतःचे जीवन आत्मघाताने संपवणे होय. आत्महत्या कायद्याने गुन्हा तर धर्माने पाप आहे. खरे तर जन्म आणि मृत्यु हे चक्र आपल्या हाती नाही तरीही आपण ही चूक करुन बसतो. एवढा अमूल्य मानवी जन्म कृतार्थ करण्याऐवजी आपल्याच पायावर धोंडा मारुन घेणे कदापि योग्य नाही. आत्महत्या करण्याऐवजी येणा-या संकटांचा धैर्याने, शांतचित्ताने व आत्मविश्वासाने सामना केल्यास आपले भवितव्य वाईटाकडून चांगलयाकडे वळेल.

गेल्या काही वर्षांपासून आपण सामाजिक परिस्थिती,वातावरण यांचा आढावा घेतल्यास ते फारच गढूळ झाले आहे हे सहज लक्षात येईल. स्वातंञ्यानंतर काही काळातच भ्रष्टाचाराने समाजातील सर्व क्षेञांना ग्रासून टाकले आहे. या खराब वातावरणामुळे आपण कुठेही असलो तरी सुरक्षेची जाणीव आपल्याला कधीच होणार नाही. कलियुगामुळे की काय ?पृथ्वीतलावरील सर्व 'मनुष्यप्राणी' स्वतःचा स्वार्थ साधण्यात दंग आहेत. त्यामुळे स्वतःलाही व त्याचबरोबर भावी पिढीलाही समस्यांच्या विळख्यात अडकवत आहेत
भाराभार अभ्यासक्रम, शाळा-कॉलेजातील नीट न शिकविणारा प्राध्यापक वर्ग (exceptions सोडून)  त्यामुळे वेगवेगळे क्लास व होणारी दमछाक, अभ्यासास कमी वेळ मिळणे व त्यातूनच गुणांचा आलेख घसरण्याची भीती या गोष्टींमुळे गेल्या काही महिन्यांत (2010) तब्बल 75 हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपविण्याचा पर्याय निवडला आहे व काही जणांच्या मनात तो घोळत
तो घोळतही असेल. त्यामुळे हे आत्महत्यांचे सञ दिवसेंदिवस सुरुच आहे.
या समस्यांमुळे या विषयाकडे पालक व अन्य व्यक्ती गंभीरपणे लक्ष घालत आहेत ही चांगली बाब आहे.

मूळ समस्या म्हणजे आत्महत्या का वाढत आहेत ? व कशा रोखायच्या ?

सामाजिक, कौटुंबिक संस्कार आजच्या पिढीवर केले जात नाहीत. पूर्वीच्या काळी 'एकञ कुटूंब पध्दतीत' आजी-आजोबा मुलांची काळजी घेऊन त्यांना घडवत असत. अध्यात्मिक, व्यावहारिक हरत-हेचे संस्कार करत असत.त्यामुळे मुले परिपक्व बनत व स्वतःच्या पायांवर उभी राहण्याइतपत सक्षम बनत. परंतु काळाच्या वेगाबरोबर आपल्या संस्कृतीतील 'संस्कार' हा पैलू नष्ट होत चालला आहे.

# पालकांनी करावयाचे संस्कार:-

कधी-कधी मुलांना भविष्याची भलतीच भीती दाखविली जाते. मुलांचे वय ते काय? बिचारे ते मूल भविष्याच्या चिंतेने भेदरुन जाते. आईवडीलांनी मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचे छंद जोपासले पाहिजेत
चांगल्या वाईटाची जात्यांना प्रत्यक्ष येऊ दिली पाहिजे. मुलाचे विचार ऐकून घेऊन, योग्य मार्गदर्शन करुन त्याला आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी प्रेरीत केले पाहिजे. आपल्या महत्त्वकांक्षांची ओझी मुलांवर लादू नयेत. आपले मूल डॉक्टर, इंजिनिअर झाले तरच त्याचे भवितव्य उज्वल असेल असा अट्टहास न धरता तो चांगला माणूस होणे अपेक्षित आहे.

या शिक्षण क्षेञात 600 हून अधिक विषय आहेत हे अनेक पालकांना माहित नसते. तेव्हा मुलाच्या आवडी-निवडीनुसार त्याचा एखाद्या विषयातील कल पाहून लहानपणापासूनच त्याला योग्य मार्गदर्शन मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. मूल घाबरल्यास, निराश झाल्यास त्याला समजावून सांगावे की 'बाळा परीक्षा महणजे आयुष्य नव्हे, परीक्षेची भीती काय बाळगतोस ?' एकाग्र हो ! आत्मविश्वासाने, जिद्दीने प्रामाणिक प्रयत्न तू कर ! तू यशस्वी होशीलच !
यामुळे निदान मुलाला स्फूर्ती, जिद्द लाभते व पुढे ते आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होते. गरज आहे ती फक्त पालकांनी पुढाकार घ्यायची, आपल्या मुलांच्या समस्या समजून घेण्याची.

# सामाजिक संस्कार :

समाज सुधारला आहे असे बाह्य निरीक्षणावरुन वाटते पण 'दिसते तसे नसते, महणून तर जग फसते !'ही म्हण लक्षात ठेवायला हवी. समाजाने मुलांपुढे जर आदर्श निर्माण केले तरच आपण मुलांच्या बौध्दिक
वाढीसाठी नक्की पोषक वातावरण (शोषक नको !) निर्माण करु शकतो.

# प्रसारमाध्यमांची भूमिका ~

प्रसारमाध्यमांची शक्ती काही अंशी जर मुलांवर संस्कार घडविण्याकडे वळविली तर समाजव्यवस्था वेगाने सुधारेल. रटाळ मालिका बंद करुन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाशी निगडीत व जगातील वैविध्यपूर्ण मनोरंजनात्मक तसेच वैद्यानिक माहिती पुरविणा-या मालिका दाखविल्या तर सगळीकडून फायदा होऊन TRP वाढेल. मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध क्षेञांतील यशोशिखरावरील व्यक्तींच्या मुलाखती सादर कराव्यात. चिञरुपाने अभ्यासक्रम शिकविल्यास 10~12 वीच्या मुलांना 'सेल्फ स्टडीला' वेळ मिळेल आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत महाविद्यालयांची धांदल उडणार नाही.

# शिक्षण,शाळा पातळीवरील संस्कार :

शिक्षण खात्याने भ्रष्ट कारभार सोडून विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न होता dnyaनार्थी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांना 8वी पर्यंत पास करणे हा निर्णय 60~70% बरोबर आहे कारण नापास होणारी मुलांची संख्या तशी फारच कमी असते तसेच घेतल्या जाणा-या परीक्षा हलक्या~फुलक्या आनंददायी वातावरणात घेतल्या तसेच मुलांच्या बुध्दीला,कल्पकतेला चालना देणारे प्रश्न परीक्षेत टाकले तर नापास न होणाच्या विचाराने निर्भयपणे तो नक्कीच प्रश्न कसून सोडविण्याचा प्रयत्न करेल. फक्त या सरकारी निर्णयाचा प्रत्येकाने सकारात्मक अर्थ घेतल्यास पाल्यांना हुशार करण्यासाठी पालकमंडळी जोरदार पावले उचलू शकतात. याचबरोबर जे निर्णय शैक्षणिक वर्षात घेतले जाणार (10-12 वी) आहेत ते परीक्षेअगोदरच घ्यावेत व बदल करु नयेत यामुळे अनेक समस्या सुटतील.व मानहानीकारक प्रसंग या क्षेञावर येणार नाहीत.

शिक्षण क्षेञ देश पातळीवरील (11-12)वी अभ्यासक्रम समान करणार आहे ही चांगली बाब आहे. त्यामुळे विद्यार्थी देशपातळीवरील AIEEE,IIT या व अशा परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जातील व हा अभ्यासक्रम महाविद्यालयांनी वेळेत शिकविल्यास मुलांची वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसची Crash Courses ची धावपळ वाचेल, त्यांना स्वःअभ्यासास वेळ मिळेल. 9व 11वी मध्येच 10-12चा अभ्यास कव्हर केल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढेल.
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेञाचा दर्जा सुधारला, मानवी स्वार्थी स्वभाव बदलला तर 'सर्व शिक्षा अभियान' हे कधीच 'सर्व भ्रष्ट अभियान' होणार नाही. मुलांचा सर्वांगीण विकास होईल याकडे पालक-मुले-शिक्षक यांनी आता लक्ष द्यायलाच हवे. रॅगिंगसारख्या अयोग्य गोष्टींवर सरकार कडक कारवाई करते आहे ही गोष्ट कौतुकास्पदच !

# विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी ~

विद्यार्थ्यांनी आहार~विहार उत्तम राखल्यास शरीर निरोगी राहील, स्मरणशक्ती ही त्यामुळे तल्लख राहील. मुलांना किशोरवयातच शाळा, कॉलेज व ईतर संस्थांच्या माध्यमातून सर्व गोष्टींचे परिपूर्ण द्न्यान दिल्यास ती भरकटणार नाहीत, वाममार्ग टाळतील. तसेच शिक्षणातही भरघोस यश मिळवतील, परिणामी आत्महत्या रोखण्यात आपल्याला भरघोस यश लाभेल. याचबरोबर विद्यार्थी मिञांनी नकारात्मक विचार मनात आणू नयेत.

न्यूनगंडाला थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून फाजील आत्मविश्वास न बाळगता अभ्यासक्रम पूर्णपणे समजून घेतल्यास इतरांशी, शिक्षकांशी मनमोकळेपणे चर्चा केल्यास अनेक समस्यांची उकल होईल व त्यामुळे नक्कीच यश आपल्या हातात असेल. छोट्या~छोट्या संकटांनी नाऊमेद व्हायचे नसते. हे जगच असे आहे की ते आपल्यावर संकटे कोसळविणारच !
'डेव्हिड हार्टमन' या अंध विद्यार्थ्याने संकटांनी नाऊमेद न होता वैद्यकक्षेञात डॉक्टर होण्यात यश मिळविले.

"(एकाग्रता+आत्मविश्वास)*(जिद्द,चिकाटी)= यश !"

हे सूञ आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.

काशी तीर्थक्षेञाच्या रस्त्यावरुन एकदा स्वामी विवेकानंद पळत होते...एका गृहस्थाने त्यांना थांबवून कारण विचारले, तेव्हा सवामींजींनी पाठीमागे लागलेल्या माकडांकडे बोट दाखविले...
गृहस्थ शांतपणे म्हणाले, पळू नका.. धिटाईने माकडांकडे पहा..
आणि आश्चर्य असे की असे करताच माकडे दूर पळून गेली.. तात्पर्य एवढेच 'संकटे ही माकडांसारखी असतात. त्यांचा जिद्दीने, धैर्याने सामना केल्यास ती आपणाकडे पाठ फिरवितात अन्यथा पाठीमागे लागतात.' जॉर्ज कार्व्हर,हेलन केलर,सुभाषचंद्र बोस, सावरकर इत्यादी. मान्यवरांनी चिकाटी,जिद्द,प्रेरणेच्या सहाय्याने यश मिळविले. 'ढ' कुणीही नसतो. आपली आकलनशक्ती आपण जेवढी नीटपणे वापरु तेवढा जगण्याचा आनंद आपण लुटू शकतो !

'बर्नांड रसेल'ही लहानपणी एकलकोंडे, चिडचिडे झाले होते, आत्महत्येचा विचारही त्यांच्या मनात डोकावत होता, परंतु भावाने 'भूमिती' शिकविल्यानंतर त्यांचे जीवन फुलले व जीवनाचे ते रसिक झाले. एक सुंदर वाक्य एका लेखकाने मांडले आहे.. "जिद्द जिवंत असेल आणि जिद्न्यासा जागी असेल तर माणसाला स्वतःचे जग, स्वतःचा प्रभाव निर्माण करता येतो." खरचं विद्यार्थ्यांनो झोकून देऊन प्रयत्न केलात तर नक्कीच अंतिम ध्येय गाठू शकाल.

संकटांवर मात करुन अंतिम ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करणारी शक्ती मनाच्या कोप-यात दडलेली असते, प्रामाणिक प्रयत्न केल्यास ही शक्ती मनाला सतेज करुन जीवनात रसिकता आणते. तेव्हा अपयशाने खचून न जाता भारतीय संस्कृतीतील मूल्यांचा आदर राखून विद्यार्थ्यांनी परिपूर्ण जीवन जगावे व देशालाही सुधारावे !!!"

! (समाप्त) !


(शिवस्पर्श दिवाळी अंक 2010) .
KONTYAHI WAPARAPURVI (share,copy-paste) Lekhak "sourabh bhunje" yanchi purvparwangi aavashyak !! *rights are reserved...